मुंबईचे मूर्तिकार   

श्री गणेशाच्या भक्तीभावपूर्ण उत्सवात मूर्तिकार आणि मूर्तिशाळा यांचा सहभाग फारच मोलाचा...

गणेश मूर्ती घरगुती असो वा सार्वजनिक, मूर्तिकार आणि मूर्तिशाळा यांच्याशी प्रत्येकाचं भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे. श्री गणेश मूर्ती घडवण्यात महत्वाचा घटक असलेले हे मूर्तिकार आणि मूर्तिशाळा याबद्दल आपल्याला फार कमी माहिती असतं. यानिमित्ताने मुंबईतले मूर्तिकार आणि मूर्तिशाळा यांच्याबद्दल !

लालबागमध्ये सुमारे ७६ वर्षं काम करत असलेली बागवे आर्ट्स ही मूर्तीशाळा... बाळकृष्ण जयराम बागवे यांनी ही मूर्तीशाळा सुरु केली. आज त्यांची तीन मुलं शशिकांत, मनोहर आणि सदानंद ही मूर्तीशाळा अगदी भक्तिभावाने आणि जबाबदारीने सांभाळताहेत. या मूर्तीशाळेत अधिकतर शाडूच्या गणेश मूर्ती तयार होतात.

पोहेकर आर्ट्स, लालबाग या मूर्तीशाळेत आज पोहेकरांची तिसरी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळते आहे. जवळजवळ १०० वर्षं जुनी असलेली मूर्तीशाळा.. बाल गणेशाची मूर्ती हे पोहेकरांच्या पहिल्या पिढीपासूनचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे.