स्पर्धेची मुख्य आयोजक
संस्था 'जाणीव' यांच्याबद्दल...
'जाणीव... मुळांची आणि मूल्यांची !' असे ब्रीदवाक्य असलेला आणि माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या प्रेरणेने उभा राहीलेला 'जाणीव' सेवान्यास ! महानगर टेलिफोन निगम मधील कामगार संघाच्या वतीने युनियनमध्ये देणगीरुपाने जमा झालेला निधी सामाजिक कामासाठी उपयोगात आणण्याच्या सद्हेतूने श्री. अरविंद सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली हा सेवान्यास स्थापन करण्यात आला.
श्री. अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून उतरलेले सेवान्यासाचे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यासाठी सामाजिक बांधिलकीची मूळ विचारधारणा वर्धिष्णू करताना जीवन मूल्ये न विसरता 'जाणीव'ची समाजसेवा सुरु आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत, खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, संकटग्रस्त व आपत्तीग्रस्तांना मदत, कला-क्रिडा क्षेत्रातील गुणीजनांना योग्य मदत, महाराष्ट्रीय व भारतीय संस्कृतीची जपणूक आणि तिचा प्रचार व प्रसार, पर्यावरणरक्षणार्थ वृक्षलागवड व संवर्धन, जनजागृतीपर उपक्रम अशा विविध उपक्रमांनी 'जाणीव' कार्यरत आहे.
कोरोनाकाळात 'जाणीव'ने रुग्णवाहिका प्रदान केल्या, कोविडयोद्ध्यांसाठी आवश्यक सामग्री, गरजूंसाठी अन्नधान्य वाटप करून महत्वपूर्ण काम केले आहे. लॉकडाऊन काळात स्वेच्छानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालेली असतानाही महानगर टेलिफोन निगम कामगार संघातर्फे २५ लाख रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रदान करण्यात आला. या कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कर्मचारी पतपेढीतर्फेही ११,११,१११/- रु. निधी देण्यात आला.
भविष्यात शाळा उभारुन गरीब व गरजू मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी काही भरीव योजना आकारास आणण्यासाठी 'जाणीव' प्रयत्नशील आहे.