top of page

   मुंबईचे बाप्पा   

मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावातल्या केशवजी नाईक चाळीमध्ये सुरु झाला. त्यानंतर मुंबापुरीमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.

सार्वजनिक गणेशोत्सव हे एकूणच मुंबईकरांच्या भक्तीपूर्ण सांस्कृतिक भावनेचे प्रतीक ठरले. यानिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा केल्याचा आनंद मुंबईकरांच्या चेहऱ्यावर दिसतो, तो अद्वितीय असतो.

मुंबईतल्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबद्दल जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल.

  गिरगावचा केशवजी नाईक चाळीचा गणपती  

Keshavji Naik Chawl.png

आज सर्वत्र उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा केला जात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली गेली, ते ठिकाण म्हणजे गिरगावातली केशवजी नाईक चाळ. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण व्हावी, त्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे व्हावेत, असं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना टिळक यांना वाटंत होतं आणि याच प्रेरणेतून केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. हा मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव. साल होतं १८९३.

केशवजी नाईक यांनी उभारलेल्या या सात चाळींच्या समूहामध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, कवी केशवसुत, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, नाटककार वीर वामनराव जोशी, समाजवादी नेते एस. एम. जोशी आदींसह अनेक थोर व्यक्तिमत्वांचं वास्तव्य होतं. कालांतराने दोन चाळींच्या मध्ये असलेल्या मोठ्या जागेमध्ये हा उत्सव सुरु झाला, तो आजतागायत सुरु आहे.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक थोर मंडळींनी या गणेशोत्सवाला भेट दिली. त्यांची व्याख्यानंही आयोजित करण्यात आली. मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत ‘केशवजी नाईक चाळीचा गणपती’ हे मानाचं पान आहे.

छायाचित्र : विदेश बाईकर (नेटवरुन साभार)

   चिंचपोकळीचा चिंतामणी   

चिंचपोकळीचा प्रसिध्द चिंतामणी राजासुध्दा स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारावलेल्या प्रेरणेतून उभा राहीला. १९२० साली या मंडळाची स्थापना झाली. लोक शिक्षणाचं कार्य करणं, हा महत्वाचा उद्देश असलेल्या या मंडळाची वाटचाल आजतागायत जोमाने सुरु आहे.

या मंडळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकदाच वर्गणी काढली जाते आणि वर्षभर विविध कार्यक्रम सुरु राहतात. 

चिंतामणीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर मुंबईबाहेरुनही हजारो भक्त येतात.

Chinchpokali Ganpati.png
bottom of page